नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीवर प्रवास करीत असतांना एकास लिफ्ट देणे चालकास चांगलेच महागात पडले आहे. डबलसिट बसलेल्या युवकाने चालकाच्या पाठीस लावलेल्या बॅगेतील ५० हजाराची रोकड लांबविली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानस रंजन सामल (४७ रा.मानेनगर धात्रक फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सामल गुरूवारी (दि.६) सकाळच्या सुमारास अमृतधाम भागात बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते पैसे काढून ते घराकडे जाण्यासाठी दुचाकीवर परतीच्या प्रवासास लागले असता ही घटना घडली. अमृतधाम येथील चौफुली परिसरात रस्त्यात उभ्या असलेल्या एका २२ वर्षीय तरूणाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. संतोष टी पॉईट येथे सोडण्याबाबत सदर तरूणाने विनवणी केल्याने सामल यांनी त्यास आपल्या दुचाकीवर डबलसीट बसविले.
प्रवासात संशयित तरूणाने सामल यांच्या पाठीशी लावलेल्या बॅगेतील ४७ हजार ३६० रूपयांची रोकड हातोहात लांबविली. सामल यांनी सदर युवकास संतोष टी पॉईट भागात सोडून आपले घर गाठले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. बॅगेच्या तपासणीत रोकड चोरी झाल्याचे लक्षात येताच सामल यांनी माघारी फिरून युवकाचा शोध घेतला मात्र तो हाती लागला नाही. त्यामुळे त्यांना पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.