नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सरकारी नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून बदलापूर येथील भामट्याने शहरातील एका महाविद्यालयातील सात तरूणांना आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे मुख्य सचिवांचा पीए असल्याची बतावणी करीत भामट्याने तब्बल ७१ लाख रूपये उकळले असून, दोन वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने बेरोजगारांनी पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश धोंडू कदम (रा.हेरंब अपा.मांजरली दिपाली पार्क रोड बदलापूर) असे बेरोजगारांना गंडा घालणा-या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत संकेत शिवाजी कोटकर (रा.नैताळे ता.निफाड) या युवकाने फिर्याद दिली आहे. कोटकर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो अन्य मुलांसह रूम करून राहतो. संशयित २०२३ मध्ये कोटकर याच्या संपर्कात आला होता. एका मित्राच्या माध्यमातून ही ओळख झाली होती. तत्कालीन राज्याचे मुख्यसचिवांचा पिए असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणांची सशयिताने मने जिंकली. यानंतर झालेल्या वेगवेगळया भेटी दरम्यान कोटकर यांच्यासह महाविद्यालयीन तरूणांना सरकारी नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले. यावेळी त्याने मोठमोठ्या लोकप्रतिनीधींसह प्रशासनातील अधिका-यांशीही ओळखी असल्याची बतावणी करीत ही फसवणुक केली.
वेगवेगळया विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने कोटकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्याकडून रोकड उकळली. अनेकांनी ही रक्कम धनादेशाद्वारे अदा केली असून संशयिताने पत्नी संगिता प्रकाश कदम उर्फ संगिता विजय केदारे यांच्या बँकखात्यात या रकमा जमा केला. प्रारंभी खातेनिहाय नोकर भरती नुसार संशयिताने तरूणांना फार्म भरण्यास भाग पाडले मात्र कुठेही त्यांचे काम झाले नाही. तीन वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने अखेर बेरोजगारांनी पैश्यांसाठी तगादा लावल्याने संशयिताने टोलवा टोलवी केल्याने हा प्रकार समोर आला असून यात ७१ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. याबाबत एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.