नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हद्दपारीची कारवाई केलेली असतांना विनापरवानगी राजरोसपणे शहरात वावरणा-या तडिपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने फुलेनगर येथील भराडवाडीत ही कारवाई केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तान्हाजी उर्फ तान्ह्या उर्फ जवाहरलाल देवराम शिंदे (३३ रा.मच्छाबाजार,भराडवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. तान्हाजी शिंदे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केलेली आहे. शहर व जिह्यातून त्यास पंधरा महिन्यासाठी तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता.
पोलीस त्याच्या मागावर असताना बुधवारी (दि.५) भराडवाडी मच्छीबाजारात तो युनिट १ च्या हाती लागला. याप्रकरणी हवालदार योगीराज गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.