नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी गावात जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या भाच्याचा सहा जणांनी निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील सहाही आरोपींनाा इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत अटक केली. ही घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. नटेश विजय साळवे (रा. वील्लोळी, ता. नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नटेश हा रिक्षाचालक शशिकांत रामदास गांगुर्डे (वय २६, रा. संघर्ष नगर, नाशिक) यांचा भाचा होता.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २२ सप्टेंबर रोजी रात्री नटेश हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून जात असताना त्याला सहा जणांनी गाठले. जुन्या वादातून आरोपींनी नटेशला धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच खून केला. ही घटना पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी शशिकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी अत्यंत तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष् दोंदे, प्रफुल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे आणि करण बावळ अशा सहाही आरोपींना एका तासाच्या आत अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करत आहेत.