नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घरासमोर मित्रा समवेत गप्पा मारत उभे असतांना दुचाकीस्वार भामट्यांनी एका तरूणाच्या गळयातील दोन सोनसाखळया ओरबाडून नेल्याची घटना सिडकोतील विवेकानंदनगर भागात घडली. या घटनेत ७० ग्रॅम वजनाच्या व सुमारे पावणे पाच लाख रूपये किमतीच्या सोनसाखळींवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावेश सुरेश पवार (३५ रा. एकता चौक, स्वामी विवेकानंदनगर) या तरूणाने याबाबत फिर्याद दिली आहे. पवार मंगळवारी (दि.४) रात्री मित्र अश्विन पांचाळ याच्या समवेत आपल्या घरासमोर गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. दोघे मित्र गप्पा मारत असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील दोन सोनसाखळय़ा ओरबाडून नेल्या.
या घटनेत ७० ग्रॅम वजनाच्या व सुमारे ४ लाख ८६ हजार ५१६ रूपये किमतीच्या सोनसाखळींवर भामट्यांनी डल्ला मारला आहे. हा प्रकार घडल्यानंतर दोघा मित्रांनी आरडाओरडा करीत चोरट्यांचा पाठलाग केला मात्र संशयित स्टेट बँक चौकाच्या दिशेने पसार झाले अधिका तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.