नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहून तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याने हा प्रकर उघड झाला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शांताराम लोंढे (२६ रा. माडसांगवी ता.जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडितेचे कुटुंबिय माडसांगवी गावात भाडेतत्वावर राहतात. कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले की, संशयिताने घरी एकट्या असलेल्या मुलीस गाठून हे कृत्य केले. अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्याने मुलीस प्रेमाच्या जाळयात अडकवून विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी मुलीवर बळजबरीने बलात्कार केला.
हा प्रकार नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होता. यातून मुलगी गर्भवती राहिली होती. नुकतीच तिचे बाळंतपण झाले असून तिने गोंडस मुलीस जन्म दिला आहे. यामुळे या घटनेचा इलगडा झाला असून, कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.