नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेल्याचा प्रकार इंदिरानगर येथील आदर्श कॉलनीत घडला. या घटनेत सुमारे आठ वर्षापूर्वीच्या झाडाचे खोड भामट्यांनी पळविले असून याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
अजय छबुलाल पाटील (रा.इच्छामय बंगला,आदर्श कॉलनी महिला बँकेमागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडावर भामट्यांनी डल्ला मारला. सोमवारी (दि.३) मध्यरात्री अज्ञात तस्करांनी आठ वर्षापूर्वीच्या झाडाचे खोड कापून नेले असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपारासह एका गुन्ह्यात पसार असलेल्या संशयिताच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने मंगळवारी (दि.४ ) देवळाली गाव व रोकडोबावाडी भागात केली. दोघा संशयितांना उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
आदेश निवृत्ती बुवा (१९ रा.धोबीमळा,देवळाली गाव) व आकाश सोमनाथ पवार (२९ रा.रोकडोबावाडी) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे असून बुवा एका गुन्ह्यातील संशयित असून आकाश पवार हा तडिपार गुंडा आहे. हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे उपगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात पसार असलेला बुवा आपल्या घरी असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घर परिसरात सापळा लावून संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या. तर पोलीस रेकॉर्डवरील आकाश पवार या तडिपाराच्या रोकडोबावाडी येथील नित्यानंद आश्रम परिसरात मुसक्या आवळण्यात आल्या.
संशयिताबाबत अमलदार संजय पोटींदे यांना माहिती मिळाली होती. दोघा संशयितांना उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे,जमादार प्रेमचंद गांगुर्डे, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर,चंद्रकांत गवळी,प्रकाश महाजन,वाल्मिक चव्हाण,नितीन फुलमाळी,अंमलदार संजय पोटीदे व जितेंद्र वजिरे आदींच्या पथकाने केली.