नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चैनस्नॅचर धुमाकूळ घालत असून, मंगळवारी (दि.४) वेगवेगळया ठिकाणी दोन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. त्यात सुमारे तीन लाखाचे अलंकार भामट्यांनी पळवून नेले असून याप्रकरणी आडगाव आणि इदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव शिवारातील स्वामी समर्थ नगर भागात राहणा-या सिंधूबाई विसपूते (रा.भाग्यश्री रो हाऊस) या वृध्दा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घर परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालविकास केंद्र परिसरातून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील अलंकार बळजबरीने हिसकावून जत्रा हॉटेल चौकाच्या दिशेने पोबारा केला.
या घटनेत विसपूते यांच्या गळय़ातील सोन्याची पोत व मंगळसूत्र असा २ लाख ४० हजार रूपये किमतीचा ऐवज भामट्यांनी पळविला असून याप्रकरणी मुलगा नितीन विसपूते यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत. दुसरी घटना राजीवनगर भागात घडली. प्रमिला जगन्नाथ रोकडे (रा.कैलासनगर चेतनानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रोकडे या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राजीवनगरच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. उमा सोसायटी परिसरात पल्सरवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ा्तील सुमारे ६५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उफनिरीक्षक पाटील करीत आहेत.