नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या नातेवाईकाने महिलेच्या घरातील रोकडसह दागिण्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत ६ लाख ८६ हजार रूपयांचा ऐवज भामट्याने चोरून नेला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्देश अशोक आडभाई (रा.सोनगाव ता.निफाड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सुनिता तुकाराम ढगे (रा.शिवाजी चौक,नवले गिरणीजवळ पाथर्डीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ढगे यांचा संशयित भाचा असून तो गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरी वास्तव्यास होता.
चोरीचा प्रकार उघडकीस येण्यापूर्वीच तो निघून गेल्याने हा संशय व्यक्त करण्यात आला असून या घटनेत भामट्याने ढगे यांच्या किचनमधील कपाटात ठेवलेली ४५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ८६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.