नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूररोडवरील डी.के.नगर भागात कौटुंबिक वादातून संतप्त पतीने मद्याच्या नशेत आपल्या पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत धारदार कोयता आणि कुकरचे झाकन डोक्यात मारल्याने पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित पती पसार झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता छत्रगुन गोरे (४५ रा. स्वास्तिक निवास सोसा.डी.के.नगर) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गोरे कुटुंबिय डी.के.नगर येथील स्वस्तीक निवास सोसायटीत भाडेतत्वावर राहतात. मंगळवारी (दि.४) दुपारी मुलगा आपल्या कामावर गेला असता ही घटना घडली. गोरे कुटुंबियाचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याचे नियोजन असल्याने दाम्पत्याकडून दुपारच्या सुमारास संसारोपयोगी साहित्याची आवरसावर सुरू होती. यावेळी किरकोळ कारणातून गोरे दांम्पत्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने ही हत्या झाली.
मद्याच्या नशेत असलेल्या संशयित पती छत्रगुन मुरलीधर गोरे (५०) याने पत्नी सविता गोरे यांच्या डोक्यात प्रथम कुकरच्या झाकणाने हल्ला केला. त्यानंतर धारदार कोयता हाती लागल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात आणि पाठीवर व पायावर सपासप वार केले. या घटनेत रक्तंबबाळ अवस्थेतील सविता गोरे या जवळील लाकडी पलंगावर पडल्या. त्यांची मुलगी मुक्ता बालाजी लिखे या घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुक्ता यांनी बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर वडील छत्रगुन यांनी दरवाजा उघडला मात्र त्याच वेळी त्याने धुम ठोकली. मुक्ता लिखे यांना आपली आर्ई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये आढळून आली. मात्र तोपर्यंत संशयित छत्रगुन तेथून पसार झाला.
मुक्ता हिने हंबरडा फोडल्याने शेजा-यानी धाव घेत ही माहिती गंगापूर पोलीसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरिक्षक सुशील जुमडे व निरिक्षक जग्वेंद्रसिंह राजपुत यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. पथकांनी पाहणी करीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हारूग्णालयात रवाना केला असून, याबाबत मुक्ता लिखे यांच्या फियार्दीनुसार छत्रगुन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.