नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्राहकांचा विश्वास संपादन करीत एका सराफाने दुरूस्ती व नव्याने बनविण्यासाठी दिलेले लाखोंचे दागिणे व रोकड घेवून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सव्वा चार लाखाहून अधिक रकमेची फसवणुक झाल्याचा प्रथम दर्शनी आढळून आले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित सुखदेव भुनिया (रा.खांदवे निवास,मखमलाबादनाका) असे पसार झालेल्या संशयित सराफाचे नाव आहे. भुनिया याचे मखमलाबाद नाका भागात ओमसाईराम नावाचे अलंकार दुकान होते. गेल्या काही दिवसांपासून संशयिताने दुकान बंद करून पोबारा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे या बाबत संगिता संतोष माळवे (रा. मखमलाबादनाका) या महिलेने फिर्याद दिली आहे. माळवे यांनी सुमारे अडिच तोळे वजनाची जुनी पोत संशयिताकडे नव्याने घडवणीसाठी दिली होती. यात सोन्याची वाढ करण्याचे ठरल्याने माळवे यांनी ३० हजाराची रोकडही संशयिताच्या स्वाधिन केले होते. याप्रमाणेच परिसरातील महिलांचेही संशयिताने जुन्या घडवणीचे दागिणे नव्याने तयार करण्यासाठी ताब्यात घेतले होते.
गेल्या अनेक वर्षापासून संशयिताचे याभागात दुकान असल्याने परिसरातील नागरीकांचा त्याच्यावर विश्वास होता. यातून अनेक पुरूषांनीही त्याच्याकडे नवीन अलंकार बनविण्यासाठी टाकले होते. अनेकांनी जुन्या दागिण्यांमध्ये वाढ करण्यासाठी अलंकारासह मोठ्या रकमाही संशयिताच्या स्वाधिन केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद असल्याने ग्राहकांनी शोध घेतला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला असून भुनिया या सराफाने सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड पदरात पाडून घेत पोबारा केल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी पोलीसात धाव घेतली असून यात ४ लाख १२ हजार रूपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र हा अकडा वाढण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.