नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात शिरून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली असून पोलीसांनी संशयितास तात्काळ बेड्या ठोकल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार रमेश दत्तात्रेय चव्हाण (४४ रा.साई व्हिला अपा.पाथर्डी शिवार) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन पिडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे. विक्रीकर भवन पाठीमागे राहणारी अल्पवयीन पीडिता रविवारी (दि.२) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लहान बहिणीसमवेत झोपलेली असतांना संशयिताने हे कृत्य केले होते.
उघड्या घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने प्रवेश करीत मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दोघा बहिणींना आरडाओरड केल्याने संशयिताने पळ काढला होता. याबाबत तक्रार प्राप्त होताच इंदिरानगर पोलीसांनी संशयितास हुडकून काढले असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.