नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जमिन खरेदी विक्रीतील कमिशनच्या वादातून दोघांनी एका वृध्दाकडून तब्बल २७ लाख रूपयांची खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळकत विक्री प्रकरणात भामट्यांकडून दडपशाहीने मागणी वाढल्याने वृध्दाने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोईन शकील मणियार व शकिल बनेमिया मणियार (रा.दोघे प्रभात सिनेमा समोर,दुधबाजार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अन्वर इब्राहिम मणियार (६३ रा. आयशानगर, पखालरोड) यांनी फिर्याद दिली आहे. अन्वर मणियार यांची मौजे म्हसरूळ शिवारात मिळकत आहे. सर्व्हे नं. १३७-२ यासी क्षेत्र २ हेक्टर ६२ आर मिळकतीचा गेल्या वर्षी व्यवहार झाला.
या व्यवहाराशी कुठलाही संबध नसतांना दोघा संशयितांनी व्यवहार घडवून आणल्याचा दावा करीत व अन्वर मणियार यांना धाकदडपशा दाखवून कमिशन पोटी तब्बल २७ लाखाची खंडणी वसूल केली. दहशतीखाली आणून दोघांनी व्यवहारानुसार अजून खंडणीची मागणी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.