नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रील काढतांना व्यत्यय आणल्याने दोघांनी एका तरूणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनी परिसरात घडला असून या घटनेत पाठीवर वार करण्यात आल्याने युवक जखमी झाला आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू सोळसे व साई संतोश तुपसुंदर अशी तरूणावर कोयत्याने वार करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत पप्पू जयमंगल गौड (रा.दत्तनगर,अंबड) या युवकाने फिर्याद दिली आहे. पप्पू गौंड हा युवक रविवारी (दि.२) रात्री आपल्या दोघा भावंडासमवेत म्हाडा कॉलनीत भाडे तत्वावरील घराचा शोध घेण्यासाठी गेला असता ही घटना घडली. भर रस्त्यात दोघे संशयित हातात कोयता घेवून सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रील काढत होते.
मोबाईलच्या माध्यमातून याबाबत चित्रीकरण करीत असतांना रस्त्याने तीघे भावंडे गेल्याने हा हल्ला झाला रील काढत असतांना व्यत्यय आणल्याच्या वादातून संशयितांनी तिघा भावंडाना शिवीगाळ करीत पप्पू गौड याच्या पाठीवर धारदार कोयत्याने वार केले असून त्यात तो जखमी झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.