नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यावसायीक स्पर्धेतून खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना जिल्हा रूग्णालय परिसरातील फुटफाथवर घडली. या घटनेत महिलेसह एक व्यावसायीक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी ही हाणामारी झाली. शैलेंद्र सुरेश मंडलिक (रा.कालिकानगर) यांनी फिर्याद दिली आहे. मंडलिक यांच्या खाद्यपदार्थच्या गाडीवर आलेल्या दोन ग्राहकांच्या वादातून ही घटना घडली शेजारील वडापाव विक्रेता असद व त्याची पत्नी यास्मीन यांनी पत्नीस शिवीगाळ करीत मुलगा अनिरूध्द यास असद व त्याच्या मामाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
तर यास्मीन अजमदअली शहा (रा.पंचशिलनगर,गंजमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की. शेजारील खाद्यपदार्थ विक्रेत्याने आपल्या दुकानावर बसलेल्या ग्राहकांना बोलावून घेतले. याबाबत विचारणा केली असता संशयित शैलेंद्र मंडलिक,त्याची पत्नी रूपाली,मुलगा अनिरूध्द व अन्य साथीदारांनी शिवीगाळ करीत मायलेकींना मारहाण केली. या घटनेत महिलेस दगड फेकून मारण्यात आल्याने तिच्या हातास व पायास दुखापत झाली असून याबाबत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार लोंढे व साबळे करीत आहेत.