नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुटुंबिय घरात नसल्याची संधी साधत शेजारील महिलेने बंद घर उघडून लाखोंच्या रोकडसह दागिण्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराधा अमोल चौहाण (रा. कांकरीया ज्वेलर्स उंटवाडीरोड,खेतवाणी लॉन्स जवळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत शंकर भगवानसिंग लाल यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार एकाच इमारतीत वास्तव्यास असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. लाल कुटुंबिय गुरूवारी (दि.३०) रोजी दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
महिलेने कुटुंबिय घरात नसल्याची संधी साधत कशाने तरी बंद घराचा दरवाजा उघडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली १ लाख ४३ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ८७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. लाल कुटूंबिय घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या पाहणीत या चोरीचा उलगडा झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.