नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवून बदलापूरच्या नातेवाईकाने एका बांधकाम व्यावसायीकास तब्बल अडिच कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम आणि मायनिंग व्यवसायाचे आमिष दाखवून ही फसवणुक करण्यात आली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार संजीव शंकर आव्हाड, मीना संजीव आव्हाड व कार्तिक संजीव आव्हाड (रा.सर्व वालिवली,कुलगाव बदलापूर जि.ठाणे) अशी गंडा घालणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत संजय शांताराम सांगळे (मुळ रा.नागापूर ता.नांदगाव हल्ली कॅनडा कॉर्नर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार हे एकमेकांचे नातेवाईक असून दोघेही बांधकाम व्यावसायीक आहेत.
२०२० मध्ये आव्हाड कुटुंबियानी सांगळे यांची भेट घेत ठाणे जिह्यात मोठे काम मिळाल्याची बतावणी करीत त्यांना भागिदारीचा प्रस्ताव मांडला होता. सांगळे यांनी हा प्रस्ताव स्विकारत बांधकाम व्यवसायाशी संलग्न दोन जेसीबी, दोन पोकलॅन मशिन, चार डंम्पर, स्टोन क्रेशर असे संपूर्ण युनिट पुरविले. यानंतर या कुटुंबियांनी पुन्हा मायनिंग व्यवसायाचे आमिष दाखविले. त्यानुसार सांगळे यांनी अडिच कोटी रूपयांची रक्कम संशयितांकडे सुपूर्द केली. मात्र संशयितानी या रकमेचा वैयक्तीक वापर केल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितांनी वाहन व साहित्य परत न करता अडिच कोटी रूपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक जानकर करीत आहेत.