नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सव्वा सहा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घरफोडीची पहिली घटना आडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर भागात घडली. याबाबत धिरज कैलास महाजन (रा.श्री अपार्टर्मेट साकार प्लाझा जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. महाजन कुटुंबिय गुरूवारी (दि.३०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ८५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील मोरवाडीत घडली. पंडीत कॉलनीत राहणारे शफी मोहम्मद बादशाह कादरी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कादरी कुटुंबिय २४ ते २९ जानेवारी दरम्यान अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली २७ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ५८ हजार ५५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे करीत आहेत.