नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोडावून फोडून संगणक साहित्य चोरी केल्याप्रकरणी पोलीसांनी एकास बेड्या ठोकल्या. बनावट चावीने गोडावून उघडून ही चोरी झाली होती. या घटनेत सुमारे आठ लाख रूपये किमतीच्या संगणक साहित्यावर डल्ला मारला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तोहिल शकिल सैय्यद (रा.खडकाळी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना गंजमाळ येथील सुपर मार्केट भागातील शॉप नं.१७ मध्ये घडली होती. याबाबत हर्षल राजेंद्रकुमार टोकसे (रा.जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. टोकसे यांचा संगणक खरेदी विक्रीचा व्यवसाय असून शॉप न. १७ मध्ये त्यांचे गोडावून आहे.
गेल्या बुधवारी (दि.२२) रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या शटरचे कुलूप बनावट चावीने उघडून सुमारे आठ लाख रूपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. त्यात विविध कंपनीचे मॉनिटर,सीपीयूसह तत्सर पार्टचा समावेश होता. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.