नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून, वेगवेगळया भागातून तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली,सातपूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जुने नाशिक भागातील यश दिलीप ललवाणी (रा.मालगावकरवाडा,आसराची वेस मोदकेश्वर मंदिराजवळ) यांची मोटारसायकल एमएच १५ जेव्ही ८२९९ गेल्या शनिवारी (दि.२५) रात्री त्यांच्या घरपरिसरात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ढमाले करीत आहेत.
दुसरी घटना बेळगाव ढगा ता.जि.नाशिक येथे घडली. आलेश भानुदास गांगुर्डे (रा.त्र्यंबक विद्या मंदिर जवळ,बेळगाव ढगा) यानी फिर्याद दिली आहे. गांंगुर्डे यांची स्प्लेंडर एमएच १५ बीबी ३३९५ गेल्या गुरूवारी (दि.२३) रात्री त्यांच्या घराजवळ लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.
तिसरी घटना नाशिकरोड रेल्वेस्टेशन भागात घडली. मयुर प्रकाश केदारे (रा.आगरटाकळी,समतानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. केदारे गेल्या रविवारी (दि.१९) नाशिकरोड रेल्वेस्थानक भागात गेले होते. रेल्वे ट्रॅक्शन वर्कशॉप भागात त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ एफए ५९५४ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.