नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून एकाने घरात घुसून महिलेस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना बिटको फॅक्टरीरोड भागात घडली. या घटनेत महिलेने आरडाओरड केल्याने संशयिताने धुम ठोकली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर विवेकानंद वाघमारे (रा.रोझा कॉलनी,नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड येथील बिटको फॅक्टरीरोड भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित व पीडिता यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. त्याची पीडितेने पोलीसात तक्रार केली आहे. महिलेने पोलीसात तक्रार केल्याच्या रागातून संशयिताने सोमवारी (दि.२७) तिचे घर गाठून हे कृत्य केले.
घरात शिरलेल्या संशयिताने महिलेस अश्लिल शिवीगाळ करीत स्कार्पने तोंड बांधले. यानंतर त्याने मारहाण करीत पीडितेस घराबाहेर ओढत आणत विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्याने शेजारी व परिसरातील नागरीक जमा झाल्याने संशयिताने धुम ठोकली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.