नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– औद्योगीक वसाहतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, अंबड आणि सातपूरमध्ये झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे १ लाख ३२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील अधिक सदाशिव देशमुख (रा.हिरे शाळे जवळ, सावतानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देशमुख कुटुंबिय रविवारी (दि.२६) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली २५ हजाराची रोकड व सोन्याची पोत असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
दुसरी घरफोडी भरदिवसा झाली. सातपूर औद्योगीक वसाहतीतील अजिंक्य राजू सोनवणे (रा.गणेशनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटूंबिय मंगळवारी (दि.२८) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७७ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.









