नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोघा मित्रांना मारहाण करीत टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकरोड येथील रिपोर्ट कॉर्नर भागात घडली. या घटनेत धारदार कोयत्याचा वापर करण्यात आल्याने १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, पोलीसानी नऊ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बाळू रोकडे (२३ रा.सुभाषरोड पवारवाडी),प्रेम अजय बत्तीसे (२२ रा.जिउद्दीन डेपो वजन काट्याच्या बाजूला),अनुराग उर्फ झम्प्या अनिल हिरे (२३ रा.सुभाषरोड पवारवाडी),प्रथमेश उर्फ मोट्या नेल्सन कसबे (२६ रा.सुभाषरोड पवारवाडी),राम बाळू पवार (२२ रा.अरिंगळे मळा विठ्ठल मंदिराजवळ), शाहरूख निसार शेख (२६ रा.सुभाषरोड पवारवाडी), श्याम बाळू पवार (२२ रा.अरिंगळे मळा विठ्ठल मंदिराजवळ), रोहित दिपक जमदडे (२५ सोमवार बाजार देवळाली गाव ) व जावेद हमीद शेख (२८ रा.सुभाषरोड पवारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पवन वाल्मिक घोरपडे (१५ रा.वाघोबा चौक सुंदरनगर देवळाली गाव) या मुलाने फिर्याद दिली आहे. पवन घोरपडे व अनिकेत उर्फ तान्या हे दोघे मित्र बुधवारी (दि.२२) रात्री सुभाषरोड भागात गेले असता ही घटना घडली. रिपोर्ट कॉर्नर येथील अंडाबुर्जीच्या गाडी जवळ थांबलेल्या टोळक्याने जुन्या वादाची कुरापत काढून दोघा मित्रांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्यात पवन घोरपडे यास पकडून ठेवत टोळक्याने जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर धारदार कोयत्याने वार केले असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.