नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक मागणीतून शहरातील माहेरवासिन असलेल्या दोन महिलांचा सासरच्या मंडळीने छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्त्रीधन काढून घेतल्याने दोघींना घराबाहेर काढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी सातपूर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
गंगापूररोडवरील हिडन माय फेअर या सोसायटीत राहणा-या विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या वर्षी १७ मार्च ते २१ मे दरम्यान तिचा छळ करण्यात आला. पती व सासू सास-याने माहेरून चार ते पाच लाख रूपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. अंगावरील स्त्रीधन काढून घेत तिला मारहाण क रण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
दुसरी घटना छत्रपती सभाजी मार्गावरील कैलासनगर व सारोळे थडी ता.निफाड भागात घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार मुलगी झाल्याने पतीसह सासू सास-यांनी तिचा छळ केला. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून क्रुर वागणूक देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.