नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकरोड परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोन तरूणांनी बुधवारी (दि.२२) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
राज अनिल सोनवणे (२० रा.दंडे वस्ती एकलहरेरोड) या युवकाने मंगळवारी मध्यरात्री अज्ञात कारणातून किर्लोस्कर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गवळी बाबा मंदिरासमोरील जंगलात चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिवराज खैरणार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.
दुसरी घटना सिन्नरफाटा भागात घडली. विशाल भास्कर मोरे (३८ रा.दामोदर चौक पाथर्डी फाटा) याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास सिन्नर फाटा परिसरातील रेल्वे कंपाऊड जवळील बाभळीच्या झाडाला कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत अंमलदार केतन कोकाटे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.