नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्व्हीस चांगली दिली नाही या वादातून दोघानी हॉटेल मालकावर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना वास्को चौकात घडली. या घटनेत हॉटेल मालकाच्या हातास दुखापत झाली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत धोंडगे व पवन घोरपडे अशी हॉटेलमालकावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत कमल गुरूचरण कुमार (रा.वास्कोचौक,ना.रोड) यानी फिर्याद दिली आहे. कमल कुमार हॉटेल व्यावसायीक असून त्यांचे वास्को चौकातील सोनी बार समोर हॉटेल आहे. बुधवारी (दि.२२) रात्री दोघे संशयित हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण आटोपून दोघांनी काऊंरवर पैसे देण्याचा बहाणा करून हा हल्ला केला.
दारू व जेवण लवकर दिले नाही या वादातून संशयितांनी कमल कुमार यांच्याशी वाद घातला. यावेळी संतप्त दोघांनी त्याना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी घोरपडे नामक संशयिताने दिलेल्या बिलाच्या पैशांची मागणी करीत कमरेला लावलेला धारदार कोयता काढून हातावर वार केला. या घटनेत कमल कुमार जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.