नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा रूग्णालय आवारात महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वीच झाडास गळफास लावून घेत एका महिलेने आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ ही दुसरी घटना घडल्याने या भागातील सुरक्षा यंत्रणा चर्चेत आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुर्गा महाले (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. महाले या महिलेने बुधवारी (दि.२२) अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. जिल्हा रूग्णालय आवारातील पाण्याची टाकी भागात रात्रीच्या सुमारास ती बेशुध्द अवस्थेत मिळून आली होती. कक्ष सेवक शंकर करंजकर यानी तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मध्यरात्री डॉ. रोहित टकले यांनी तिला तपासून मृत घोषीत केले.
याबाबत अंमलदार पवार यांनी दिलेल्या खबरीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.