नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाकळीरोड भागातील गुटख्याच्या गोडावूनवर अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत साडे तेरा लाख रूपये किमतीचा प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकील मतीउल्ला अन्सारी (रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे गुटख्याचा साठा करून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन (रा. उद्योग भवन, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. टाकळीरोडवरील काठे मळा भागातील एका गोडावून मध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती एफडीए पथकास मिळाली होती.
त्यानुसार पथकाने बुधवारी (दि.२२) दत्तमंदिर परिसरातील अनमोल फुडस जवळील गोडावूनवर छापा टाकला. पथकाच्या पाहणीत येथे विवीध कंपनीचा पानमसाला व सुगंधी तंबाखूची साठवणुक बेकायदा विक्रीसाठी केल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून १३ लाख ५७ हजार ४२० रूपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.