नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विद्यार्थ्यांच्या रूममधून चोरट्यांनी लॅपटॉप व टॅब चोरून नेल्याचा प्रकार अमृतधाम भागात घडला. या घटनेत सुमारे ७० हजार रूपये किमतीचे तीन लॅबटॉप व एक टॅब भामट्यांनी पळविला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळचा मालेगाव येथील तेजस पोपट निकम (रा.सर्वज्ञ अपा.मिरा दातार रोड,स्वामी नारायण नगर) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. निकम व त्याचे मित्र केके वाघ इंजिनिअरीग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून याच भागातील सर्वज्ञ अपार्टमेंटमध्ये ते वास्तव्यास आहेत. शनिवार व रविवारी कॉलेजला सुट्टी असल्याने सर्व मित्र शुक्रवारी (दि.१७) दुपारी आपआपल्या गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रूमचा दरवाजा उघडून तीन लॅपटॉप व एक टॅब असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
वृध्देची ३५ हजाराची सोनसाखळी चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बाजारातील गर्दीची संधी साधत भामट्या महिलांनी एका वृध्देची सोनसाखळी हातोहात लांबविली. ही घटना देवळाली गावातील सोमवार बाजारात घडली. या घटनेत सुमारे ३५ हजार रूपये किमतीच्या सोनसाखळीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा विनायक शिंदे (६५ रा.वालदेवी पंपींग वडनेर गेट) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे या सोमवार (दि.२०) रोजी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवळाली गावात भरणाºया सोमवार बाजारात गेल्या होत्या. गर्दीत त्या खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात महिलांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.
चार जुगारींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका परिसरात उघड्यावर जुगार खेळणा-या चार जुगारींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण रामदास पवार (रा.उंबरखेडरोड पिंपळगाव ब.),दिपक शिवाजी वावळे (रा.भिमवाडी,गंजमाळ),मधुकर अरूण कुलकर्णी (रा.गंजमाळ) व गजानन विष्णू उबाळे (रा.कालीका मंदिरामागे,मुंबईनाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. द्वारका परिसरातील भुयारी मार्गात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकला असता संशयित भुयारी मार्गाच्या भिंती लगत उघड्यावर पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले.
संशयितांच्या ताब्यातून २ हजार ५४० रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून याबाबत अंमलदार जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.