नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चरस या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईतील ड्रग्ज पेडलरला पोलीसांनी बेड्या ठोकल्या. द्वारका परिसरात मंगळवारी (दि.२१) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून ४९ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान शकिल फालके (३२, रा. मुंब्रा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. मुंबई नाकाचे अंमलदार फरीद इनामदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सलमान फालके सोमवारी अमली पदार्थ विक्रीसाठी नाशिक शहरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने मध्यरात्री सापळा रचला असता संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला.
गडकरी चौकातून सारडा सर्कलकडे जाणा-या मार्गावर पोलिसांनी संशयितास शिताफीने बेड्या ठोकल्या. त्याच्या अंगझडतीत चरस नावाचा अमली पदार्थ मिळून आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फालके यास २०२३ मध्ये नाशिकच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. वडाळागावातील छोटया भाभीला एमडी ड्रग्जचा पुरवठा केल्याचा त्याच्यावर आरोप होता. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.