नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हॉटेल कामगार असलेल्या दोन परप्रांतीय भावांची दाम्पत्याने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्वास संपादन करीत दाम्पत्याने दोघा भावांना लाखोंचा गंडा घातला असून, या घटनेत सात लाख ८८ हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पैसे देण्यास टाळाटाळ झाल्याने परप्रांतीय बंधूनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरज शहाणी व नेहासिंग शहाणी अशी ठकबाज दांम्पत्याचे नाव आहे. याबाबत रामप्रसाद फुल्लन रॉय (२४ रा.काळेनगर,आनंदवली) या युवकाने फिर्याद दिली आहे. रामप्रसाद रॉय व आकाश रॉय हे दोघे परप्रांतीय बंधू मुंबईनाका परिसरातील मकालू या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. या हॉटेलमध्ये शहाणी दांम्पत्याचे येणे जाणे असल्याने त्यांची ओळख झाली होती.
रॉय बंधूची शहाणी दाम्पत्याकडून काळजीपूर्वक विचारपूस होत असल्याने त्याच्यात जवळीक वाढली. यातून दोघामध्ये आर्थिक व्यवहार झाले. जानेवारी ते ऑगष्ट २०२३ दरम्यान दाम्पत्याने वेळोवेळी दोघा भावांकडून हात उसनवार म्हणून ऑनलाईन रकमा स्विकारल्या. या घटनेत दोघा भावांना ठकबाज दाम्पत्याने तब्बल ७ लाख ८७ हजार ३१९ रूपयांना गंडविले असून दाम्पत्याकडून पैसे परत देण्यास टाळाटाळ होवू लागल्याने दोघा भावांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.