नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्ता बांधकामात भागीदारांनी नुकसानीची रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट दस्तऐवाजाच्या माध्यमातून कोट्यावधींची रक्कम परस्पर अन्य कंपनीच्या नावे वर्ग करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला असून, या घटनेत तब्बल साडे बारा कोटी रूपयांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शकुर सय्यद (रा.पवननगर,सिडको),संदिप रविंद्र भाटीया,करण सिंग,जोजी थॉमस व इमोर्टल कंपनीचे संचालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत.
याबाबत पंकजकुमार आनंदकुमार ठाकुर (रा. सांताक्रुझ,मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार हे बांधकाम व्यावसायीक असून त्यांनी सन.२०१४ ते सन. २०२२ या काळात आय.एस. इन्फास्ट्रकचर प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून भागीदारीत रस्ता बांधकामाचे काम केले. या कामाच्या नुकसान भरपाईतील २५ कोटी २५ लाख ३५ हजार या मुळ रकमेतील बारा कोटी ६१ लाख ६८ हजार रूपयांची रक्कम संशयितांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कट कारस्थान रचून संशयितांनी बनावट दस्तऐवज बँकेत सादर करून ती रक्कम इनोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीच्या खात्यात बेकायदा वर्ग करून ठाकुर यांच्या कंपनीची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.