नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.२०) आत्महत्या केली. त्यातील एकाने गळफास लावून घेत तर दुस-याने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपनगर येथील पगारे मळा भागात राहणा-या उमेश नारायण साखरे (३४ रा.गितगंगा सोसा.) यांनी रविवारी (दि.१९) आपल्या भावाच्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्यास बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना सोमवारी डॉ. पवन तेजा यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत. दुसरी घटना मोहगाव ता.जि.नाशिक येथे घडली. भागीरथ शंकर कुवर (५५ रा. मराठी शाळेजवळ मोहगाव) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात अडगईला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस पाटील साहेबराव बटाव यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.