नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्द महिलेच्या गळय़ातील अलंकार लांबविल्याचा प्रकार राजीवनगर भागात घडला. या घटनेत मदतीचा बहाणा करून भामट्यांनी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे दागिणे पळविले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तेगेकिली शकतिवेल नाडार (६६ रा.रघूकुल अपा. डे केअर स्कूलजवळ चेतनानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नाडार या बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास घर परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. राजीवनगर येथील बोरा हॉस्पिटल समोरून त्या पायी जात असतांना स्कुटर आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले.
पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे चेकिंग सुरू असून अंगावरील दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला संशयितांनी दिला. यावेळी मदतीचा बहाना करून भामट्यांनी नाडार यांच्या गळयातील सोनसाखळी तसेच मंगळसुत्र असा सुमारे १ लाख १२ हजार रूपये किमतीचे अलंकार हातचलाखीने लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना मखमलबाद शिवारातील मानकर मळा भागात घडली. या घटनेत सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या शॉर्ट पोतवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना विनोद शिरसाठ (रा.राहूल चौक,लिलावती हॉस्पिटलमागे,विद्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिरसाठ बुधवारी (दि.१८) परिसरातील मानकर मळा भागात गेल्या होत्या. स्वामी समर्थ फर्निचर दुकानासमोरून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ््यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची शॉर्ट पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक गावित करीत आहेत.