नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पगाराची मागणी केल्याने तिघांनी दमदाटी करीत नोकरास मारहाण केली. भद्रकाली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मटण मार्केटमध्ये हा प्रकार घडला असून यात नोकराच्या नाकाचे हाड तुटले आहे. याबाबत चिकन व्यावसायीक असलेल्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबु मुल्तानी,राजू मुल्तानी व सईस मुल्तानी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत यासर गुलाम रसुल शेख (२१ रा.बागवानपुरा,भद्रकाली) या तरूणाने फिर्याद दिली आहे. मुल्तानी कुटूंबियाचा भद्रकाली पोलीस स्टेशन समोरील मटण मार्केट मध्ये एम.एम. ट्रेडर्स नावाचे चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. या दुकानात यासर शेख कामास आहे. एक महिन्यांचा पगार घेणे बाकी असल्याने त्याने राजू मुल्तानी यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता ही घटना घडली.
मुल्तानी यांनी चारसे रुपये हातात टेकल्याने शेख याने पूर्ण पगाराची मागणी केली असता ही हाणामारी झाली. मुल्तानी बंधूंनी शेख यास शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत नाकावर बुक्के मारण्यात आल्याने त्याच्या नाकाचे हाड तुटले असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.