नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सराफ पितापुत्रास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापूर येथील दोघांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट्यावधींच्या आर्थिक फसवणुकीतून कर्जबाजारी झालेल्या पितापुत्राने गेल्या आठवड्यात टोकाचे पाऊल उचलले होते. याबाबत सुसाईड नोट पोलीसांच्या हाती लागल्याने या घटनेचा उलगडा झाला होता.
अमोल सुरेश यादव आणि मोहन सचदेव (रा.दोघे सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यापाच्यांची नावे आहेत. याबाबत वनिता प्रशांत गुरव (रा.रामराज्य संकुल उत्तर दरवाजा,काळाराम मंदिराजवळ) यानी फिर्याद दिली आहे. सराफ बाजारातील ए. एस. गुरव अॅण्ड सन्स सराफ दुकानाचे संचालक प्रशांत आत्मारामशेठ गुरव (४९) व मुलगा अभिषेक प्रशांत गुरव (२८) यांनी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गेल्या सोमवारी (दि.१३) रामराज्य संकुल या इमारतीत घडली होती.
गुरव यांच्या पत्नी देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या असताना त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत ओळखीच्या नागरिकांना संदेश पाठविले होते. तसेच मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटच्या आधारे पंचवटी पोलीसांनी हा गुन्हा केला असून अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.