नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना काठेगल्लीतील गणेशनगर भागात घडली. पतंग उडवित असतांना तोल जावून पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
नक्ष संदीप बनकर (वय ८, रा. काठे गल्ली) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. २०) घडली. पारस पार्क या इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर नक्ष बनकर हा अन्य दोन मित्रांसह पतंग उडवत होता. अचानक तोल गेल्याने तो डकवर जावून पडला होता. या घटनेत डक वरील पत्र्या तुटल्याने चौथ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळला. अचानक मोठा आवाज आल्याने नागरीकांनी धाव घेतली असता तो जखमी अवस्थेत मिळून आला.
कुटूंबियांनी तात्काळ मुंबईनाका परिसरातील चिरंजीवी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास डॉ. शिवाजी पठाडे यानी त्यास तपासून मृत घोषीत केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास हवालदार सय्यद करीत आहेत.