नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात चैनस्नॅचर पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१९) इंदिरानगर भागात दोन तर जेलरोड परिसरात एक चैनस्नॅचिंगची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास काही अंतराने या वेगवेगळया ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून, यात तीन महिलांच्या गळय़ातील सुमारे पावणे दोन लाखाच्या अलंकारांवर भामट्यानी डल्ला मारला. याप्रकरणी पोलीस दप्तरी जबरीचोरीच्या गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे.
वासननगर भागात पहिली घटना घडली. सरोज शरद व्यास (६४ रा. गामणे ग्राऊंडसमोर वासननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. व्यास रविवारी सायंकाळच्या सुमारास मैत्रीण शैला बोडके यांच्या समवेत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. सात वाजेच्या सुमारास त्या गामणे मैदानाजवळील मुंबई वडापाव दुकानासमोरू त्या पायी जात असतांना ही घटना घडली. दोघी मैत्रीणी गप्पा मारत रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी व्यास यांच्या गळयातील सुमारे ८० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. दुसरी घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील सार्थकनगर भागात घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने भामट्यांनी वृध्देच्या गळय़ातील मंगळसुत्र लांबिले. याबाबत माधुरी श्रीराम गोडबोले (६५ रा. चर्चमागे,सार्थकनगर) यानी फिर्याद दिली आहे. गोडबोले रविवारी रात्री जेवण आटोपून आपल्या घर परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली.
चर्च मागील राज वैभव बिल्डींग समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची वाट अडविली. द्वारकानगरच्या रस्त्याची विचारणा करीत भामट्यांनी पाठीमागील बिल्डींगचे नाव विचारत ही चैनस्नॅचिंग केली. पाठीमागील बिल्डींगकडे बघण्यासाठी गोडबोले या वळल्या असता संशयितापैकी एकाने त्यांच्या गळयातील ४५ हजाराचे मंगळसुत्र ओरबाडून पोबारा केला. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळया गुन्हयांची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील व सहाय्यक निरीक्षक सोनार करीत आहेत. तिसरी घटना जेलरोड भागात घडली. मंदा भिकन गडवे (५५ रा.पंचक जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गडवे या शनिवारी रात्री भाजीपाला खरेदी करण्यासाठी जेलरोड येथील शनिचौक भागात गेल्या होत्या. साडे आठच्या सुमारास त्या भाजी मार्केटमधून खरेदी करून राहत्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. वक्रतुंड बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना मोपेड दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी करीत आहेत.