नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बिर्यानीची ऑर्डर पोहचविण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयला टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना पेठरोड येथील अश्वमेधनगर भागात घडली. या घटनेत धारदार शस्त्राने मारहाण करीत भामट्यांनी मोबाईल हिसकावून पाच हजाराची रोकड ऑनलाईन लांबविली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर जाधव व त्याचे बाबा,आजू आणि दुर्गेश नामक साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत राज संदिप शेळके (२५ रा.चांदशी आनंदवली) या युवकाने फिर्याद दिली आहे. शेळके डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. शनिवारी (दि.१८) रात्री तो द बिर्याणी लाईफ या हॉटेलवरील ऑर्डर पोहच करण्यासाठी दुचाकीवर अश्वमेधनगर येथील श्रीधर कॉलनीत गेला असता ही घटना घडली. सागर जाधव यांनी मागविलेली लखनवी चिकन बिर्याणीची ऑर्डर घेवून तो रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दिलेल्या पत्यावर पोहचला होता. संबधीतांनी ऑर्डर पदारात पाडून घेत त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली.
या घटनेत संशयितांनी धारदार शस्त्र उलट्या बाजूने मारून त्या दुखापत केली. तसेच खिशातील ८०० रूपयांची रोकड बळजबरी काढून घेत तसेच जीवे मारण्याची धमकी दे गुप्तांग दाबून मोबाईल हिसकावून घेतला. या मोबाईलमधील फोन पे अॅपच्या माध्यमातून ५ हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. अधिक तपास दिपक पटारे करीत आहेत.