नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडी परिसरात महिलेचा खून करून परिसरातील जेम्स स्कुल समोरील मोकळया मैदानात आणून टाकल्याचा अंदाज बांधला जात असून पोलिसांचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने खून का करण्यात आला याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. भारती माणिक वाळटे, (५६, रा. कमल नगर हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पोलिसांना खबर मिळाली होती. हिरावाडी परिसरातील जेम्स स्कुल समोरील मोकळ्या मैदानात एक महिला मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या भारती माणिक वाळटे, ५६, रा. कमल नगर हिरावाडी यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पाहणी केली असता भारती यांच्या उजव्या डोळ्यावर जखम झालेली असून, त्यांच्या गळ्याभोवती काळसर आणि निळसर व्रण दिसून आले आहे. त्यामुळे भारती यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
तसेच, घटनास्थळी भारती यांच्याशी काही झटापट झाल्याबाबत काहीही आढळून आलेले नाही. त्यामुळे भारती यांचा खून करून घटनास्थळी आणून टाकले का असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात असून, त्यादिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरो गुन्हा दाखल करण्यात येत आहे.