नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबध आणि आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सासºयाने दिलेल्या फिर्यादीवरून सूने विरोधात पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती गवांदे (३२ रा.पाथर्डी फाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत उल्हासनगर येथील मनोहर गवांदे यांनी फिर्याद दिली आहे. संशयित महिलेचा पती प्रितम गवांदे यांनी गेल्या १२ ऑगष्ट रोजी शहरातील व्हिक्टोरीया पुलावरून उडी घेत आत्महत्या केली होती. पत्नीच्या शारिरीक व मानसिक जाचास कंटाळून ही आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गवांदे दांम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता. कोरोना काळात मुलगा प्रितम आर्थिक संकटात सापडल्याने सूनेने त्याचा छळ केला. विवाह बाह्य संबधाताचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, वडिलांकडून दहा लाख रूपये आणावेत या मागणीसाठी पत्नीने केल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.