नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवरा पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीने आपल्या नातेवाईकांसोबत मिळून नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील हिंदुस्थान नगर परिसरात घडली आहे. याबाबत मयताची पत्नी तिचे दोन भाऊ आणि एक नातेवाईक आणि एक अनोळखी संशयितांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने नवऱ्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत खुनाच्या गुन्ह्यात मयताच्या दुसऱ्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर चार फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि मयताची पहिली पत्नी निरमा भावसार पवार, ३०, रा. खिसकुली सर्कल, अटलादरा, बडोदरा, गुजरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भावसार मुलचंद पवार उर्फ बाल्या, ४५, रा. खिसकुली सर्कल, अटलादरा, बडोदरा, गुजरात यांनी निरमा यांची सावत्र बहीण सुनीता नागेश शिंदे यांच्याशी दुसरे लग्न केले होते. मात्र, भावसार हा आपल्या पहिल्या पत्नीकडे गुजरातमध्ये राहत होता. या दरम्यान दुसरी पत्नी सुनीता ही अधूनमधून गुजरात येथे येत जात होती. तिला मुलबाळ नव्हते म्हणून ती नेहमी भावसार यांच्याशी भांडण करायची. दोन दिवसांपूर्वी नुकतीच सुनीता ही भांडण करून नाशिक येथील हिंदुस्थान नगर, आडगाव शिवार येथे माहेरी आली होती. शुक्रवार १७ रोजी निरमा पवार आपला पती भावसार पवार आणि मुलीला घेऊन आईवडिलांना भेटण्यासाठी आडगाव शिवारातील हिंदुस्थान नगर येथे आले होते. यावेळी सुनीता हिने पुन्हा भावसार याच्याशी सकाळपासून भांडण सुरु केले. यावेळी तिचे भाऊ राज नागेश शिंदे आणि आदित नागेश शिंदे हे देखील भांडत होते.
संध्याकाळी अचानक भावसार पवार यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील सर्वजण बाहेर आले असता संशयित सुनीता, तिचे भाऊ राज शिंदे, आदित शिंदे, त्यांचा नातेवाईक दीपक आणि एक अनोळखी संशयित हे भावसार याला मारहाण करीत होते. यावेळी संशयित सुनीता, आदित शिंदे, दीपक आणि अनोळखी संशयिताने भावसार याला पकडून ठेवले असता राज याने आपल्याकडील चाकूने भावसार यांच्या पोटावर, छातीवर, पाठीत वार केले. तसेच, आदित शिंदे याने रॉडने डोक्यात मारहाण केली. चाकूचे वर्मी घाव लागल्याने भावसार पवार रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला. भावसार याला जखमी अवस्थेत
जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, संशयित सुनीता हिला ताब्यात घेतले आहे. या खुनातील संशयित राज शिंदे, आदित शिंदे, दीपक आणि अनोळखी संशयित हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.