नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परप्रांतीय २४ वर्षीय तरूणास एका दुचाकीस्वार तरूणाने लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. धारदार शस्त्राने वार करीत युवकाच्या खिशातील २० रोकड भामट्याने लांबविली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम खलासे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित लुटारूचे नाव आहे.
याबाबत मुळच्या उत्तरप्रदेशातील रक्षाराम बुनूनू भरन्दाज (हल्ली मु.लेबर कॅम्प, पार्क साईडच्या मागे हनुमानवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. भरन्दाज बुधवारी (दि.१५) सायंकाळी संशयिताच्या स्कुटीवर डबलसिट बसून ग्राहक सेवा केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला असता ही घटना घडली. आडगाव शिवारातील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून २० हजार रूपयांची रोकड काढून दोघे परतीच्या प्रवासास लागले असता संशयिताने हा हल्ला केला. जत्रा हॉटेल चौफुली परिसरात संशयिताने आपल्या ताब्यातून स्कुटी रस्त्याच्या कडेला थांबवून भरन्दाज याच्याकडे पैश्यांची मागणी केली.
मात्र भरन्दाज याने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने खिशातील रोकड बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरन्दाज पैसे देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बधून संशयिताने कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून त्याच्यावर वार केले. जखमी अवस्थेत भरन्दाज जमिनीवर कोसळला असता संशयिताने त्याच्या खिशातील २० हजाराची रक्कम बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.