नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बिटकॉईन कंपनीत गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून शहरातील तिघांनी एका वृध्दास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सव्वा पाच लाखाची फसवणुक करण्यात आली असून गुंतवणुकीसह परताव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ झाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल कुमार भामरे (रा.राणेनगर),सचिन खैरणार (रा.कामगारनगर,सातपूर) व उगलमुगले (रा.नागचौक,पंचवटी) नामक व्यक्ती अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत राजेंद्र मुरलीधर ताडगे (६० रा.मातोरीरोड,मखमलाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. ताडगे यांची सन. २०२२ मध्ये संशयितांनी भेट घेतली होती. यावेळी सचिन खैरणार यांनी बिटकॉईन कंपनी बाबत माहिती देत गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखविले.
ताडगे यांनी संशयितांच्या भुलथापांना बळी पडत सव्वा पाच लाख रूपयांची गुंतवणुक केल्याने ही फसवणुक झाली. धनादेशाद्वारे देण्यात आलेली रक्कमचा तीन वर्ष उलटूनही कुठलाही परतावा न मिळाल्याने ताडगे यांनी संबधीताकडे पैश्याचा तगादा लावला असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. संशयितांनी टोलवाटोलवी केल्याने ताडगे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उफनिरीक्षक वाघ करीत आहेत.