नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मकर संक्राती निमित्त शहरात पतंग उडविण्याचा उत्साह असतो. सोसायट्या आणि गगणचुंबी इमारतींच्या गच्चीवर संगिताच्या तालात हा खेळ खेळला जात असल्याने अनेक ठिकाणी मंगळवारी (दि.१४) हाणामा-या झाल्या. त्यातील पंचवटी आणि सातपूर भागातील तीन घटनांची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून त्यात दोघा भावांवर एका सराईताने थेट पिस्तूल रोखल्याचा प्रकार घडला आहे.
गंगापूररोड भागातील राहूल आकाश बेंडकुळे (२७ रा.बेंडकुळे मळा,युनियन बँकेजवळ गंगापूर रोड) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे बेंडकुळे मंगळवारी रात्री औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात गेला होता. बेंडकुळे व त्याचा मावसभाऊ प्रदिप शिदे हे धर्माजी कॉलनीतून जात असतांना ही घटना घडली. तडिपार राहूल दिलीप जाधव (२५ रा.धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) या सराईतांनी दोघा भावांची वाट अडविली. या घटनेत संशयिताने पतंग कापल्याच्या रागातून दोघा भावांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी दोघा भावांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने त्यांच्यावर कमरेला लावलेला पिस्तूल काढून रोखल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा हाणामारीचा प्रकार पंचवटीतील कर्ननगर भागात घडला. राहूल संजय धस (२४ ) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. धस परिसरातील खंडेराव मंदिर भागात नवीन बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींग समोरील पतंग उडवित असतांना आकाश गावंडे,पवन सोनवणे व विशाल काळे या संशयितांनी नाचण्याच्या कारणातून वाद घालत त्यास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत आकाश गावंडे या युवकाने जीवे मारण्याची धमकी देत धारदार वस्तू डोक्यात मारल्याने धस जखमी झाला आहे.
तिसरी घटना याच परिसरातील तुळजा भवानी नगर भागात घडली. याबाबत निखील दिलीप पाटील (२९ रा.विबगेअर स्कूलरोड,माऊली पेट्रोल पंपाच्या समोर) या युवकाने फिर्याद दिली आहे. निखील पाटील व हर्षल पाटील हे दोघे भाऊ आपल्या राहत्या अपार्टमेंटच्या टेरेसवर पंतग उडवित असतांना विशाल तांबे निलेश वणमाळे,सचिन आमटे व त्यांच्या तीन साथीदारांनी टेरेसवर येवून तुम्ही आम्हाला चायनिज मांजाने पतंग उडवू नका असे का म्हणाले या कारणातून वाद घालत संशयितांनी त्यांना मारहाण केली. या घटनेत दगड विटांसह लाकडी बॅट व स्टम्प तसेच प्लॅस्टीक फिरकीने मारहाण करण्यात आल्याने दोघे भाऊ जखमी झाले असून त्यातील एकाच्या बरगडींना गंभीर इजा झाली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार सानप व उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.