नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून नुकत्याच झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीसह सराफी दुकान फोडल्याचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली,सातपूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुने नाशिक भागातील सुमनदेवी सुभाष शहा (रा.नागवाडा,भद्रकाली) यांनी पहिली घरफोडीची फिर्याद दिली आहे. शहा बुधवारी (दि.१५) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बॅगेतील २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बाविस्कर करीत आहेत. दुसरी घटना खुटवडनगर भागात घडली. याबाबत नितीन हिरामण पवार (रा.साळुंखेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पवार कुटूंबिय गेल्या सोमवारी (दि.१३) नाशिकरोड भागातील नातेवाईकांकडे मुक्कामी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख २६ हजार २०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.
तिसरी घटना नाशिकरोड येथील देवी चौकात घडली. या घटनेत चोरट्यांनी सराफी दुकान फोडून सुमारे दीड लाखचा ऐवज लंपास केला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत किरण शुक्लेश्वर कुलथे (रा.गंधर्वनगरी नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. कुलथे यांचे देवी चौकात निशांत ज्वेलर्स नावाचे दुकान असून मंगळवारी (दि.१४) रात्री ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून ही चोरी केली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.