नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील भाजी मार्केट परिसरातील टवाळखोरांचा उपद्रव समोर आला आहे. भाजीपाला खरेदी विक्री करणा-या व्यावसायीकास दमदाटी करणा-या गुंडाना जाब विचारल्याने संतप्त टोळक्याने एका व्यापा-यास मारहाण केली. या घटनेत व्यापा-यास दगड फेकून मारण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजल शर्मा व तुषार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित गुंडाची नावे आहेत. याबाबत लक्ष्मण नंदू रणमाळे (रा.मेहरधाम पेठरोड) या व्यापाºयाने फिर्याद दिली आहे. रणमाळे यांचा भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय असून मार्केट यार्डात त्यांची जगदंबा व्हिजीटेबल नावाची कंपनी आहे. मगळवारी (दि.१४) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ते लिलावासाठी आपल्या दुकानाबाहेर पडले असता ही घटना घडली.
दुकानाबाहेर सहाणे नामक व्यापा-याशी दोघे टवाळखोर वाद घालत होते. संशयित व्यापा-यास शिवीगाळ करीत असल्याने रणमाळे त्यांना समजून सांगण्यासाठी गेले असता संशयित दोघांनी आपला मोर्चा रणमाळे यांच्याकडे वळवित त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. रणमाळे यांनी आपल्या बचावासाठी दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला असता संबधीतांनी दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार केशव भोये करीत आहेत. या घटनेने मार्केट यार्डातील टवाळखोरांचा विषय चर्चेत आला असून परिसरातील गुंडाचा वावर रोखण्यासाठी पोलीसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतक-यांसह व्यापा-यांकडून केली जात आहे.