नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोठ्या भावाने चुलत आत्याच्या मुलीशी विवाह केल्याने नातेवाईक असलेल्या मायलेकाने धाकल्यास बेदम मारहाण केल्याची घटना प्रबुध्दनगर येथे घडली. या घटनेत धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने धाकला भाऊ जखमी झाला असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव म्हस्के व सुनिता म्हस्के अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मायलेकाचे नाव आहे. याबाबत वैभव पुंजाराम साबळे (२० रा.श्रमिकनगर,सातपूर) या युवकाने फिर्याद दिली आहे. साबळे सोमवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास प्रबुध्दनगर येथील बुध्दविहार समोरून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली.
साबळे आपल्या घराकडे जात असतांना नातेवाईक असलेल्या संशयित मायलेकाने त्याची वाट अडवित जुन्या वादाची कुरापत काढून तसेच मोठा भाऊ आकाश साबळे याने चुलत आतेबहिणीशी विवाह केल्याच्या कारणातून त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत वैभव म्हस्के याने त्याच्या पायावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.