नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भद्रकाली पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१२ मध्ये घडलेल्या या प्रकरणात वडाळागाव येथील रहिवासी शेख रउफ रोशन या आरोपीने संस्कृती हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केला होता. रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या पत्नीची देखभाल करण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी नर्सशी गैरवर्तन केले होते.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हवालदार एम. एस. शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुमारे बारा वर्षे चाललेल्या या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफले यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादी, साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षेवरून न्यायालयाने आरोपी शेख रउफ रोशन याला भादंवि कलम ३५४ अन्वये दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल असे आदेश दिले आहेत. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी अभियोक्ता विजय सोळुंके यांनी मांडली. तर कोर्ट अंमलदार पोलीस हवालदार पी.बी. जेऊघाले यांनी खटल्याच्या सुनावणी दरम्यान पाठपुरावा केला.