नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडको परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील विवाहीतेने विषारी औषध सेवन करून तर तरूणाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबडलिंकरोड परिसरातील भारती संदिप मिश्रा (३८ रा.लक्ष्मीनगर) या विवाहीतेने सोमवारी (दि.१३) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच सासू शामा मिश्रा यांनी त्यांना परिसातील उमा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. धनंजय पाटील यांनी तिला तपासून मृत घोषीत केले.
दुसरी घटना बुरकुले हॉल परिसरात घडली. अमित प्रकाश टिळके (३२ रा.अमीरतन अपा.बुरकुले हॉलजवळ) या युवकाने मंगळवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. भाऊ अभिषेक टिळके यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार टोपले व जमादार शेख करीत आहेत.